शनिवार, १५ नोव्हेंबर, २००८

इनस्क्रिप्टचा कळपाटाचा आराखडा वापरून मराठी लिहिताना '?, !' इ. चिन्हं लिहिता येत नाहीत, ती लिहिता येण्यासाठी काय करावं?

इनस्क्रिप्टचा कळपाटाचा आराखडा वापरून मराठी लिहिताना '?, !' इ. चिन्हं लिहिता येत नाहीत, ती लिहिता येण्यासाठी काय करावं?

मराठी लिहिण्यासाठी आपण जर इनस्क्रिप्टचा कळपाटाचा आराखडा वापरत असाल तर; आधुनिक मराठी लेखनात आपण नेहमी वापरतो त्या त्या चिन्हांकरता किंवा काही गणिती चिन्हांकरता कळा नेमलेल्या नाहीत. उदा.
आधुनिक मराठी लेखनात आपण नेहमी वापरतो ती विरामचिन्हं
प्रश्नचिन्ह ?
उद्गारचिन्ह !
अर्धविराम ;
द्विबिंदू :
एकेरी अवतरणचिन्ह ''
दुहेरी अवतरणचिन्ह ""
पर्यायक /

किंवा पुढील गणिती चिन्हं
अधिक +
न्यूनतर <
अधिकतर >
टक्के %

लक्षात घ्या की युनिकोडात त्यासाठी स्वतंत्र क्रमांक दिलेले आहेत. पण इन्स्क्रिप्टच्या कळपाटात ते क्रमांक नि कळा ह्यांची जुळणी नसल्याने इन्स्क्रिप्टच्या कळपाटातून ही चिन्ह लिहिता येत नाहीत. त्यासाठी आपल्याला इंग्रजीचा कळपाट तात्पुरता वापरावा लागेल. Alt आणि Shift ह्या कळा एकदम दाबून आपण मराठी लिहिताना तात्पुरता इंग्रजीचा कळपाट वापरू शकाल.

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

संगणकातील कार्यकारी प्रणालीसोबत मिळालेल्या युनिकोडाचा वापर कसा करायचा?

संगणकातील कार्यकारी प्रणालीसोबत मिळालेल्या युनिकोडाचा वापर कसा करायचा?

आपल्या संगणकावरील कार्यकारी प्रणालीत युनिकोड असलं तरी अनेकदा ते कार्यरत केलेलं नसतं. विशेषतः आपण एखाद्या कंपनीचा आयता संगणक न घेता विविध भाग जुळवून तयार केलेला सांधीव संगणक घेतो तेव्हा. ते कार्यरत केलेलं नसेल अशा वेळी त्या कार्यकारी प्रणालीची चकती (सीडी) वापरून ते कार्यरत करून घ्यावं लागतं. ही प्रक्रिया एकदाच करावी लागते. पुन्हा पुन्हा चकती वापरावी लागत नाही. तेव्हा आपल्या संगणकावर युनिकोड बसवलेलं आहे की नाही हे एकदा तपासून घ्या.

युनिकोड म्हणजे काय?

युनिकोड म्हणजे काय?

युनिकोड ही लिपिचिन्हांची एक प्रमाणित संकेतप्रणाली आहे (पाहा : http://unicode.org).
  • ती वापरून आपण संगणकावर मराठीच्या देवनागरी लिपीत सहज लिहू शकतो. तो मजकूर इतरांना सहज वाचता येऊ शकतो.
  • ही प्रणाली आपल्या संगणकावरच्या कार्यकारी प्रणालीसोबतच (ऑपरेटिंग सिस्टिम).
  • ही प्रणाली आपल्याला विनामूल्य मिळते. त्यासाठी वेगळे पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसते.
  • ही संकेतप्रणाली प्रमाणित आहे. त्यामुळे गोंधळ होणं टळतं.
  • तिची व्याप्ती विशिष्ट भाषेपुरती नाही. जगातील बहुतेक प्रमुख भाषांच्या लिप्यांना ही प्रणाली सामावून घेते.
तिची माहिती करून घेतली तर आपण आपल्या स्वभाषेत आपल्या लिपीतून सहज व्यवहार करू शकतो. इतकंच नव्हे तर जगातल्या विविध भाषांच्या लिप्यांत एकाच वेळी काम करू शकतो. विविध देशांनी आणि व्यावसायिक कंपन्यांनी ही संकेतप्रणाली स्वीकारलेली आहे.

लिपिखुणांच्या प्रमाणित संकेतप्रणालीची आवश्यकता का असते?

लिपिखुणांच्या प्रमाणित संकेतप्रणालीची आवश्यकता का असते?

वर सांगितल्याप्रमाणे क्रमांक आणि त्यांच्याशी संबंधित खुणा ह्यांचा संच म्हणजे लिपिखुणांची संकेतप्रणाली. पण अशा विविध संकेतप्रणाल्या रचता येणं शक्य आहे. उदा. वर दिलेल्या उदाहरणातल्या क्रमांकाशी आपण ध ह्या खुणेऐवजी मा ह्या खुणेची सांगड घालू शकतो. मराठीचे आकृती, योगेश इ. टंक अशा वेगवेगळ्या संकेतप्रणाल्याच वापरत असत. ह्या प्रणाल्या एकमेकांपेक्षा वेगळ्या होत्या कारण त्यांच्यात क्रमांक आणि लिपिखुणा ह्यांची सांगड वेगवेगळी होती. म्हणजे एका संकेतप्रणालीत १०११०००१ = ध असा संकेत होता तर दुसरीत १०११०००१ = मा असा संकेत होता.

आता संगणकाला केवळ क्रमांकच कळत असल्याने आणि तो केवळ क्रमांकच साठवत असल्याने आपण लिहिलेल्या मजकुरात १०११०००१ हा क्रमांक तर असे पण तो म्हणजे कोणती खूण (ध की मा) हे टंकावर अवलंबून असायचं. आणि त्यामुळे विशिष्ट टंक नसला की साहजिकच धचा मा होत असे. म्हणजे मजकुरातल्या आकृत्या नीट उमटत नसत.

जर हे टाळायचं असेल तर क्रमांक आणि त्यांच्याशी संबंधित खुणा ह्यांतला संबंध पक्का केला पाहिजे. त्यामुळे अमुक क्रमांक म्हणजे अमुकच खूण हे ठरून जातं. एका क्रमांकावर कधीही एकच खूण राहील अशी संकेतप्रणाली प्रमाणित ठरेल. अशा संकेतप्रणालीमुळे संगणकावर आपल्या लिपीतून सहज व्यवहार करता येईल. युनिकोडामुळे अशी प्रमाणितता आणणं फारच सोपं झालं आहे.

लिपिखुणांची संकेतप्रणाली कसं काम करते?

लिपिखुणांची संकेतप्रणाली कसं काम करते?

आपण कळ दाबतो आणि संगणकाच्या पडद्यावर लिपीतली खूण उमटते. संगणकाच्या पडद्यावर आपल्याला एखाद्या लिपीतली (उदा. देवनागरी) अक्षरं उमटलेली दिसतात. खरं पाहता संगणकाला कोणत्याही लिपिखुणा (कॅरेक्टरं) कळत नाहीत. संगणक जी काही महिती साठवतो मग त्या लिपिखुणा असोत की चित्रं असोत; त्याच्या दृष्टीने ते द्विमान पद्धतीतले क्रमांक असतात. संगणकाच्या कळपाटावरची कळ आपण दाबतो तेव्हा असा एक क्रमांक आपण संगणकाकडे धाडत असतो. म्हणजे ‘ध’ ही खूण संगणकाच्या पडद्यावर उमटते तेव्हा संगणकाच्या दृष्टीने एक संकेत पाळला जातो. आपण कळ दाबून तो संकेत संगणकाला कळवतो. आपण कळ दाबतो तेव्हा एक क्रमांक उदा. १७७ (द्विमान पद्धतीत १०११०००१) हा संगणकाकडे जातो. हा क्रमांक म्हणजे ‘ध’ची खूण असा संकेत आधी ठरलेला असल्याने संगणकाच्या पडद्यावर ‘ध’ उमटतो.

अशाच रीतीने काही क्रमांक आपण कळा दाबून संगणकाकडे पोहोचवतो आणि त्या त्या क्रमांकाशी संबंधित खुणा पडद्यावर उमटतात. (इथे लक्षात ठेवायचा मुद्दा हा की दाबलेली कळ आणि उमटणारी खूण ह्यांचा थेट संबंध नाही. कळ दाबल्याने क्रमांक जातो आणि क्रमांक गेल्याने खूण उमटते. तेव्हा क्रमांक आणि खूण ह्यांचा संबंध अधिक महत्त्वाचा आहे.) क्रमांक आणि त्यांच्याशी संबंधित खुणा ह्यांचा एक संच ह्यातून साकारतो. ह्या संचाला त्या विशिष्ट लिपिखुणांची संकेतप्रणाली म्हणता येईल.

संकेतप्रणाली म्हणजे काय?

संकेतप्रणाली म्हणजे काय?

संकेतप्रणाली म्हणजे संकेतांची व्यवस्था. आपण व्यवहारात अनेक संकेतव्यवस्था वापरत असतो. लाल दिवा लागला की वाहनं थांबवायची हा एक संकेत आहे. ह्यात लाल दिवा लागणं आणि लोकांनी गाड्या थांबवणं ह्या दोन गोष्टींची सांगड बसली आहे. त्यामुळे जेव्हा कधी लाल दिवा लागतो तेव्हा लोक गाड्या थांबवतात. वाहन चालवायला शिकताना आपण हा संकेत आत्मसात करतो. लाल दिवा लागल्यावर वाहन थांबवायचं, हिरवा लागल्यावर थांबवलेलं सुरू करायचं, बाण काढलेला दिसला की वळण आहे हे समजयचं असे अनेक संकेत मिळून संकेतांची व्यवस्था बनते. उदा. वाहतुकीच्या संकेतांची व्यवस्था.

तसंच संगणकावर एक कृती केल्यावर दुसरी काही एक गोष्ट घडणं ह्या प्रकाराला संकेत म्हणायचं. संगणकाकडून काही कृती करून घ्यायच्या असतील तर त्याने त्या कृती कराव्यात हे त्याला सांगावं लागतं. ते सांगण्यासाठी विविध संकेतव्यवस्था वापरल्या जातात. उदा. आपण विशिष्ट कळ दाबली की पडद्यावर विशिष्ट आकृती उमटली पाहिजे. लिपितली चिन्हं अशा रीतीने पडद्यावर उमटवणार्‍या संकेतप्रणालीला लिपिखुणांची संकेतप्रणाली म्हणता येईल.

मराठीतून संगणकावर व्यवहार करताना ह्या अडचणी का येतात?

मराठीतून संगणकावर व्यवहार करताना ह्या अडचणी का येतात?

आपल्या लिपीतून संगणकावर व्यवहार करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी करता आल्या पाहिजेत.
  1. आपल्या लिपीतली चिन्हं त्यांच्या मांडणीच्या नियमांसकट (उदा. क+ी = की, द+्+य = द्य) संगणकाच्या पडद्यावर उमटवता आली पाहिजेत. आपण कळपाट (की-बोर्ड) वापरून, त्याच्या कळा दाबून हव्या त्या लिपिखुणा पडद्यावर उमटवू शकलो पाहिजे.
  2. आपण अशा रीतीने तयार केलेला मजकूर संगणकात व्यवस्थित साठवता आला पाहिजे आणि तो ज्या व्यक्तीला आपण पाठवू त्या व्यक्तीच्या संगणकाच्या पडद्यावर तसाच नीट उमटला पाहिजे.
ह्यासाठी आपल्याला सार्वत्रिक, प्रमाणित संकेतप्रणालीची आवश्यकता आहे (आपल्याकडे अनेकदा सार्वत्रिक कळपाटाची असं म्हणतात ते चूक आहे). वर सांगितलेल्या अडचणी यायच्या, कारण अशी प्रमाणित संकेतप्रणाली मराठीसाठी उपलब्ध नव्हती.

संगणकावर मराठीतून व्यवहार करताना येणार्याी अडचणी कोणत्या?

संगणकावर मराठीतून व्यवहार करताना येणार्‍या अडचणी कोणत्या?

संगणकावर मराठीतून व्यवहार करण्याची अनेकांची इच्छा असते. पण त्यात अनेक अडचणी आहेत हे आपण ऐकत असतो. अनुभवतही असतो. मुख्य अडचण म्हणजे सार्वत्रिक कळपाटाची (खरं तर सार्वत्रिक संकेतप्रणालीची). त्यामुळे एका टंकात (फॉण्टात) लिहिलेला मजकूर कुणाला पाठवला तर त्या व्यक्तीकडे तोच टंक (फॉण्ट) असल्याशिवाय तो मजकूर दिसणार नाही. ह्यामुळेच महाजालावर (नेटावर) संकेतस्थळ (वेबसाइट) रचताना सोबत टंक उतरवून घेण्याची सोय द्यावी लागते. आपल्याकड तो टंक नसेल तर पानावर केवळ गिरबिडच दिसते. वेगवेगळी संकेतस्थळं वेगवेगळ्या टंकांत (नि एकमेकांशी न जुळणार्‍या संकेतप्रणालीत) असल्याने गूगलसारखे हुडके (सर्च-इंजिनं) वापरून माहिती शोधायची म्हटली तरी शोधता येत नाही. इ-टपाल (इ-मेल) पाठवताना तर हे फारच त्रासाचं वाटतं. त्यापेक्षा रोमी (रोमन) लिपीतच मराठी लिहिण्याचा मार्ग अनेक जण पत्करतात. त्यात समाधान लाभत नाही पण काम तर भागतं.

प्रस्तावना

व्यवहारात येणारी एखादी अडचण सोडवण्याचा उपाय उपलब्ध असावा. पण एखाद्या समाजाला तो उपाय उपलब्ध आहे ह्याचा पत्ताच नसावा हे दुर्दैवी आहे. माहितीच्या युगात असं घडणं बरं नव्हे. संगणकावर मराठीचा वापर करताना येणार्‍या अडचणींचा पाढा आपण अजून किती काळ वाचायचा? आपण कल्पनाही करू शकलो नसतो अशा गोष्टी आज संगणकाकरवी करून घेता येत आहेत. अशा वेळी आपल्या लिपीतून आपल्या भाषेत व्यवहार करण्यातच अडचण कशी काय राहू शकते? निदान ह्या दिशेने काय प्रयत्न होत आहेत, झाले आहेत ते लोकांना कळलं पाहिजे. ही पुस्तिका लिहिण्यामागे हाच हेतू आहे. केवळ मराठीच नव्हे आणि केवळ भारतीय भाषाच नव्हे तर जगातल्या बहुतेक प्रमुख भाषांच्या लिप्यांतून सहजपणे संगणकावर व्यवहार करणं आता शक्य आहे. युनिकोड ह्या संकेतप्रणालीमुळे हे शक्य झालं आहे. तिचा परिचय ह्या पुस्तिकेत करून दिला आहे.

हा ब्लॉग संगणक वापरणार्‍या पण फार तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तींसाठी लिहिला आहे. मुख्य भर आहे तो प्रत्यक्ष उपयोगावर. तांत्रिक तपशील सोपा करून, आवश्यक वाटला तेवढाच दिला आहे. संगणकाच्या कार्यकारी प्रणालीतलं (ऑपरेटिंग सिस्टिमेत) युनिकोड कार्यरत कसं करायचं ते विंडोजसंदर्भात विस्ताराने सांगितलं आहे कारण आपल्याकडचे बहुतांश लोक ती कार्यकारी प्रणाली वापरतात असं आढळतं.

पुस्तिका उपयोगी आहे की नाही हे लोकांनी वाचून, वापरूनच ठरवावं. काही त्रुटी, चुका आढळल्या तर आम्हाला अवश्य कळवत रहावे.

सुशांत, आशिष.

सोमवार, २५ ऑगस्ट, २००८

संगणकावर मराठीतून व्यवहार : युनिकोडाच्या साहाय्याने

युनिकोड वापरून संगणकावर मराठीतून व्यवहार कसा करावा हे सांगणारी आमची पुस्तिका ह्या दुव्यावर (पीडीएफ आवृत्ती ) उपलब्ध करून दिली आहे. ती पाहावी. ह्या अनुदिनीवर हा सर्व मजकूर आणि इतर अद्ययावत माहिती आम्ही लवकरच देण्याचा प्रयत्न करू.