मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

लिपिखुणांच्या प्रमाणित संकेतप्रणालीची आवश्यकता का असते?

लिपिखुणांच्या प्रमाणित संकेतप्रणालीची आवश्यकता का असते?

वर सांगितल्याप्रमाणे क्रमांक आणि त्यांच्याशी संबंधित खुणा ह्यांचा संच म्हणजे लिपिखुणांची संकेतप्रणाली. पण अशा विविध संकेतप्रणाल्या रचता येणं शक्य आहे. उदा. वर दिलेल्या उदाहरणातल्या क्रमांकाशी आपण ध ह्या खुणेऐवजी मा ह्या खुणेची सांगड घालू शकतो. मराठीचे आकृती, योगेश इ. टंक अशा वेगवेगळ्या संकेतप्रणाल्याच वापरत असत. ह्या प्रणाल्या एकमेकांपेक्षा वेगळ्या होत्या कारण त्यांच्यात क्रमांक आणि लिपिखुणा ह्यांची सांगड वेगवेगळी होती. म्हणजे एका संकेतप्रणालीत १०११०००१ = ध असा संकेत होता तर दुसरीत १०११०००१ = मा असा संकेत होता.

आता संगणकाला केवळ क्रमांकच कळत असल्याने आणि तो केवळ क्रमांकच साठवत असल्याने आपण लिहिलेल्या मजकुरात १०११०००१ हा क्रमांक तर असे पण तो म्हणजे कोणती खूण (ध की मा) हे टंकावर अवलंबून असायचं. आणि त्यामुळे विशिष्ट टंक नसला की साहजिकच धचा मा होत असे. म्हणजे मजकुरातल्या आकृत्या नीट उमटत नसत.

जर हे टाळायचं असेल तर क्रमांक आणि त्यांच्याशी संबंधित खुणा ह्यांतला संबंध पक्का केला पाहिजे. त्यामुळे अमुक क्रमांक म्हणजे अमुकच खूण हे ठरून जातं. एका क्रमांकावर कधीही एकच खूण राहील अशी संकेतप्रणाली प्रमाणित ठरेल. अशा संकेतप्रणालीमुळे संगणकावर आपल्या लिपीतून सहज व्यवहार करता येईल. युनिकोडामुळे अशी प्रमाणितता आणणं फारच सोपं झालं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: