मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

लिपिखुणांची संकेतप्रणाली कसं काम करते?

लिपिखुणांची संकेतप्रणाली कसं काम करते?

आपण कळ दाबतो आणि संगणकाच्या पडद्यावर लिपीतली खूण उमटते. संगणकाच्या पडद्यावर आपल्याला एखाद्या लिपीतली (उदा. देवनागरी) अक्षरं उमटलेली दिसतात. खरं पाहता संगणकाला कोणत्याही लिपिखुणा (कॅरेक्टरं) कळत नाहीत. संगणक जी काही महिती साठवतो मग त्या लिपिखुणा असोत की चित्रं असोत; त्याच्या दृष्टीने ते द्विमान पद्धतीतले क्रमांक असतात. संगणकाच्या कळपाटावरची कळ आपण दाबतो तेव्हा असा एक क्रमांक आपण संगणकाकडे धाडत असतो. म्हणजे ‘ध’ ही खूण संगणकाच्या पडद्यावर उमटते तेव्हा संगणकाच्या दृष्टीने एक संकेत पाळला जातो. आपण कळ दाबून तो संकेत संगणकाला कळवतो. आपण कळ दाबतो तेव्हा एक क्रमांक उदा. १७७ (द्विमान पद्धतीत १०११०००१) हा संगणकाकडे जातो. हा क्रमांक म्हणजे ‘ध’ची खूण असा संकेत आधी ठरलेला असल्याने संगणकाच्या पडद्यावर ‘ध’ उमटतो.

अशाच रीतीने काही क्रमांक आपण कळा दाबून संगणकाकडे पोहोचवतो आणि त्या त्या क्रमांकाशी संबंधित खुणा पडद्यावर उमटतात. (इथे लक्षात ठेवायचा मुद्दा हा की दाबलेली कळ आणि उमटणारी खूण ह्यांचा थेट संबंध नाही. कळ दाबल्याने क्रमांक जातो आणि क्रमांक गेल्याने खूण उमटते. तेव्हा क्रमांक आणि खूण ह्यांचा संबंध अधिक महत्त्वाचा आहे.) क्रमांक आणि त्यांच्याशी संबंधित खुणा ह्यांचा एक संच ह्यातून साकारतो. ह्या संचाला त्या विशिष्ट लिपिखुणांची संकेतप्रणाली म्हणता येईल.

1 टिप्पणी:

Suresh Sawant म्हणाले...

आपल्‍याला मनःपूर्वक धन्‍यवाद.
आपल्‍या माहितीपुस्तिकेच्‍या सहाय्यानेच मी माझ्या संगणकावर मराठी कार्यरत केली आहे. इतरांनाही प्रवृत्‍त करतो आहे. त्‍यासंदर्भात काही प्रश्‍न पडले आहेत. आपली मदत हवी आहे.
1)संगणकावर मराठी कार्यरत करण्‍यासाठी आवश्‍यक असलेली विंडोज प्रोफेशनलची सीडी अनेकांकडे नसते. अशावेळी काय करावे?
2) marathi transliteration चा कळपाटच अनेकांना भावतो. तथापि, त्‍याचा आराखडा नसल्‍याने अनेक अक्षरे टाईप कशी करावी, ते कळत नाही. आपण ब्‍लॉगवर असा आराखडा उपलब्‍ध करुन देऊ शकाल का?
3)आकृती टाईपरायटरचा वापर मी करतो. त्‍यात अंक रोमन येतात. ती मराठीत आणण्‍यासाठी काय करावे
?