मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

संकेतप्रणाली म्हणजे काय?

संकेतप्रणाली म्हणजे काय?

संकेतप्रणाली म्हणजे संकेतांची व्यवस्था. आपण व्यवहारात अनेक संकेतव्यवस्था वापरत असतो. लाल दिवा लागला की वाहनं थांबवायची हा एक संकेत आहे. ह्यात लाल दिवा लागणं आणि लोकांनी गाड्या थांबवणं ह्या दोन गोष्टींची सांगड बसली आहे. त्यामुळे जेव्हा कधी लाल दिवा लागतो तेव्हा लोक गाड्या थांबवतात. वाहन चालवायला शिकताना आपण हा संकेत आत्मसात करतो. लाल दिवा लागल्यावर वाहन थांबवायचं, हिरवा लागल्यावर थांबवलेलं सुरू करायचं, बाण काढलेला दिसला की वळण आहे हे समजयचं असे अनेक संकेत मिळून संकेतांची व्यवस्था बनते. उदा. वाहतुकीच्या संकेतांची व्यवस्था.

तसंच संगणकावर एक कृती केल्यावर दुसरी काही एक गोष्ट घडणं ह्या प्रकाराला संकेत म्हणायचं. संगणकाकडून काही कृती करून घ्यायच्या असतील तर त्याने त्या कृती कराव्यात हे त्याला सांगावं लागतं. ते सांगण्यासाठी विविध संकेतव्यवस्था वापरल्या जातात. उदा. आपण विशिष्ट कळ दाबली की पडद्यावर विशिष्ट आकृती उमटली पाहिजे. लिपितली चिन्हं अशा रीतीने पडद्यावर उमटवणार्‍या संकेतप्रणालीला लिपिखुणांची संकेतप्रणाली म्हणता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: