शुक्रवार, ६ जुलै, २०१८

न्यायालयांतील भरतीपरीक्षेसाठी प्रमाणेतर टंकाचा वापर : प्रकट निवेदन

 

प्रति,
प्रबंधक,
मा. उच्च न्यायालय, मुंबई

जिल्हा आणि सत्र न्यायालयांतील काही पदांसाठी भरती करण्यासाठी आपल्याद्वारे टंकलेखनाच्या परीक्षा जुलै २०१८ आणि ऑगस्ट २०१८ ह्या महिन्यांत घेण्यात येत आहेत. सदर परीक्षांसंदर्भातील सूचना आपल्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.  त्यांचे दुवे खाली जोडले आहेत.
http://bombayhighcourt.nic.in/recruitment/PDF/recruitbom20180607180606.pdf
http://bombayhighcourt.nic.in/recruitment/PDF/recruitbom20180704122601.pdf
​तसेच टंकलेखनपरीक्षेसंदर्भातील सूचना
​http://bombayhighcourt.nic.in/recruitment/PDF/recruitbom20180630170505.pdf

​ह्या सूचनांत मराठीच्या टंकलेखनपरीक्षांसाठी कृतिदेव ०५५ ह्या टंकाचा वापर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. सदर संदर्भात काही बाबी आपल्या निदर्शनास आणणे महत्त्वाचे वाटते.

संगणकावर कोणत्याही भाषेतील मजकुराचा तिच्या लिपीसह वापर करताना युनिकोड (http://www.unicode.org/standard/translations/marathi.html) ही आधुनिक संकेतप्रणाली वापरण्याचा प्रघात आहे. ह्यामुळे मजकुराची देवाणघेवाण करणे तसेच मजकुरावर विविध संगणकीय प्रक्रिया करणे सुकर होते. सर्व आधुनिक संगणकीय साधनांत लिखित मजकूर तयार करणे आणि वितरित करणे ह्यासाठी युनिकोड-संकेतप्रणालीचाच वापर करण्यात येतो, तसेच त्यासाठी युनिकोड-आधारित टंक वापरण्यात येतात. असे अनेक युनिकोड-आधारित टंक महाजालावर विनामूल्य तसेच मुक्त स्वरूपात उपलब्ध आहेत.

सदर परीक्षेसाठी वापरण्यात येणारा कृतिदेव ०५५ हा टंक युनिकोड-आधारित टंक नाही. (https://en.wikipedia.org/wiki/Kruti_Dev)

​भारतीय भाषांच्या संगणकावरील गुणवत्तापूर्ण वापरासाठी युनिकोड-संकेतप्रणालीचा वापर आवश्यक आहे. ह्याबाबत गृहमंत्रालयाच्या राजभाषा विभागाने आपल्या हिंदीसंदर्भातील ​वार्षिक धोरणात तसे स्पष्ट निदेश दिलेले आहेत. (http://www.rajbhasha.nic.in/sites/default/files/ap20172018_8.pdf सदर धोरणातील २६ क्रमांकाचा निदेश पाहावा.)

महाराष्ट्र-शासनानेही २००८ पासूनच आपल्या कामकाजात मराठीच्या संगणकीय वापरासाठी युनिकोड-संकेतप्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाहा :
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20080910134320001.pdf
तसेच
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201301151243278833.pdf

आजवर देवनागरी टंकलेखनासाठी विविध आराखडे वापरण्यात येत असत. केंद्रशासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाने १९८६ साली देवनागरी टंकलेखनासाठी इन्स्क्रिप्ट ह्या आराखड्याला प्रमाणक म्हणून मान्यता दिली. १९८८मध्ये त्यात काही सुधारणा करण्यात आल्या आणि १९९१ साली भारतीय मानक ब्यूरोने (http://www.bis.org.in/) इन्स्क्रिप्ट हा आराखडा प्रमाणित केला आहे (IS 13194 : 1991, UDC 681.3 पृ. १५).
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ह्यांनी तयार केलेल्या सुधारित नियमावली, २०१४नुसार टंकलेखनाच्या परीक्षा संगणकावर घेण्यात येतात (शासन निर्णय क्रमांक:- एसपीई-१०१२/(१०८/१२/साशि-१ दि. ३१ ऑक्टोबर २०१३). उपरोक्त शासननिर्णयात पृ. ३ वरील ८व्या मुद्द्यात “मराठी संगणक टंकलेखन अभ्यासक्रमामध्ये युनिकोड प्रणालीनुसार की-बोर्ड वर Inscript Layout चा वापर करून मराठी टंकलेखनाचा सराव आवश्यक राहील.” असे म्हटले आहे.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201310311537438021.pdf

तरी उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता न्यायालयातील मराठीच्या वापरासाठीही आपण अद्ययावत तंत्रज्ञान वापरावे आणि सदर परीक्षा युनिकोड-आधारित टंक वापरून इन्स्क्रिप्ट ह्या आराखड्यावर घेण्यात याव्या ही विनंती.

मंगळवार, १२ जून, २०१८

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

उबुण्टूमध्ये मराठीत लिहा


रविवार, १८ सप्टेंबर, २०११

विंडोज-७-मध्ये मराठी वापरा

शनिवार, ११ डिसेंबर, २०१०

मराठी आयएमई

संगणकावर युनिकोडातून मराठी लिहिण्यासाठी इन्स्क्रिप्टाच्या आराखड्याव्यतिरिक्तचे इतर पर्याय वापरण्यासाठी मराठी आयएमई कसे वापरायचे ह्याविषयीची शिकवणी

शुक्रवार, १० डिसेंबर, २०१०

इन्स्क्रिप्टाच्या कळपाटाची ओळख

संगणकावर मराठी टंकलेखन करण्यासाठी इन्स्क्रिप्ट हा कळपाटाचा आराखडा वापरतात. त्याची ओळख करून देणारी दृक्-श्राव्य शिकवणी

मंगळवार, ४ मे, २०१०

फॉण्ट (font) , फॅक्स (fax) ह्या शब्दांतील ( ॲ आणि ऑ ) मराठीत कसे लिहावे - टंकलिखित (टाइप) करावे

फॉण्ट font , फॅक्स fax हे शब्द मराठीत कसे लिहावे - टंकलिखित (टाइप) करावे ?
फॉण्ट = फ + ॉ + ण + ् + ट
फॅक्स = फ + ॅ + क + ् + स
-ॲ, ऑ (ह्यातला ॲ ( ॲ - ॲक्ट (act) मधला कसा लिहाल?) अजूनही काही टंक वापरून नीट दिसत नाही ). युनिकोडात ह्या दोन्ही अक्षरांसाठी खालील चिन्हे उपलब्ध आहेत.
U+090D - ऍ (हे मराठीत वापरत नाहीत )
U+0911 - ऑ
U+0945 - ॅ
U+0949 - ॉ
U+0972 - ॲ (हे मराठीत वापरतात )
( संदर्भ: http://unicode.org/charts/PDF/U0900.pdf)
ही चिन्हे कॉपी पेस्ट करूनही वापरता येतील. करॅक्टर-मॅपमध्येही (Start>all programs>accessories>system tools>character map) ती सापडतील. युनिकोड (U+090D इ. ) वापरुन ही चिन्हे लिहिता येतात. (अधिक माहितीसाठी हे पाहा : http://unicode.org/faq/font_keyboard.html#3 ) इनस्क्रिप्टचा कळपाट (कीबोर्ड) , युनिकोड आणि टंक (फॉण्ट) ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जरी युनिकोडात (version 5.0) ही चिन्हे असली तरी ती इनस्क्रिप्टच्या कीबोर्डमध्ये अजूनही नाहीत. आणि 'ॲ' अजूनही काही टंकांमध्ये उपलब्ध नाही.
ॲ वर अधिक माहितीसाठी हे वाचा : http://pravin-s.blogspot.com/2008/09/samyak-devanagari-is-now-unicode-51.html

गुरुवार, २२ एप्रिल, २०१०

विंडोज एक्स्पीत युनिकोड कार्यरत करून मराठी कसे लि्हावे ह्याची दृक्श्राव्य शिकवणी

आपल्या संगणकावर विंडोज एक्स्पी ही कार्यकारी प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम) असेल तर त्यातील सोय वापरून युनिकोडाच्या साहाय्याने मराठीत कसं लिहिता येईल ह्याविषयीची मराठी निवेदन असलेली दृक्श्राव्य शिकवणी पाहा.


गुरुवार, १८ मार्च, २०१०

सामनाही युनिकोडात

आता सामना हे वृत्तपत्रही युनिकोडात दिसू लागले आहे. लवकरच उरलेली वृत्तपत्रेही युनिकोडात यावीत. मराठी वृत्तपत्रांच्या प्रसाराला ही गोष्ट फारच उपकारक ठरणार आहे.

सोमवार, ८ मार्च, २०१०

नवी माहितीपुस्तिका

युनिकोडाच्या साहाय्याने संगणकावर मराठी कसे वापरावे? ह्या पुस्तिकेसाठीचा दुवा उजवीकडच्या चौकटीत दिला आहे।
http://sites.google.com/site/yunikodatunmarathi/dharika ह्या संकेतस्थळावरूनही ही पुस्तिका उतरवून घेता येईल.

मंगळवार, २० जानेवारी, २००९

संगणकावर युनिकोड आहे की नाही हे कसं ओळखावं?

संगणकावर युनिकोड आहे की नाही हे कसं ओळखावं?

पुढील खुणांवर क्रमाने टिकटिकवा. Start > Control panel > Regional and Language options

. ह्या ठिकाणी गेल्यावर एक चौकट उघडेल. त्यातील वरच्या बाजूला असलेल्या Languages ह्या खुणेवर बाण नेऊन टिकटिकवा. पुढील आकृतीत दाखवल्याप्रमाणे दृश्य दिसेल.

. चौकटीच्या ह्या भागात खाली Supplemental language support ह्या भागातील दोन पर्यायांपैकी Install fiels in complex and right-to-left languages (including Thai) हा पहिला पर्याय निवडला आहे का हे पाहा जर तो निवडलेला असेल तर तुमच्या संगणकावर युनिकोड आहे. जर निवडलेला नसेल तर तुमच्या संगणकावर मराठीसाठी युनिकोड कार्यरत केलेलं नाही.

बुधवार, ७ जानेवारी, २००९

लोकसत्ता युनिकोडात !

सकाळीच सुशांत म्हणाला की लोकसत्ताने युनिकोड वापरायला सुरूवात केली आहे. http://www.loksatta.com पाहा.
आता मराठीमधील ३ चांगली वृत्तपत्रे महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ ही युनिकोडात आहेत. मराठीचा वापर वाढण्याच्या दृष्टीने हा बदल चांगला आहे.

शनिवार, १५ नोव्हेंबर, २००८

इनस्क्रिप्टचा कळपाटाचा आराखडा वापरून मराठी लिहिताना '?, !' इ. चिन्हं लिहिता येत नाहीत, ती लिहिता येण्यासाठी काय करावं?

इनस्क्रिप्टचा कळपाटाचा आराखडा वापरून मराठी लिहिताना '?, !' इ. चिन्हं लिहिता येत नाहीत, ती लिहिता येण्यासाठी काय करावं?

मराठी लिहिण्यासाठी आपण जर इनस्क्रिप्टचा कळपाटाचा आराखडा वापरत असाल तर; आधुनिक मराठी लेखनात आपण नेहमी वापरतो त्या त्या चिन्हांकरता किंवा काही गणिती चिन्हांकरता कळा नेमलेल्या नाहीत. उदा.
आधुनिक मराठी लेखनात आपण नेहमी वापरतो ती विरामचिन्हं
प्रश्नचिन्ह ?
उद्गारचिन्ह !
अर्धविराम ;
द्विबिंदू :
एकेरी अवतरणचिन्ह ''
दुहेरी अवतरणचिन्ह ""
पर्यायक /

किंवा पुढील गणिती चिन्हं
अधिक +
न्यूनतर <
अधिकतर >
टक्के %

लक्षात घ्या की युनिकोडात त्यासाठी स्वतंत्र क्रमांक दिलेले आहेत. पण इन्स्क्रिप्टच्या कळपाटात ते क्रमांक नि कळा ह्यांची जुळणी नसल्याने इन्स्क्रिप्टच्या कळपाटातून ही चिन्ह लिहिता येत नाहीत. त्यासाठी आपल्याला इंग्रजीचा कळपाट तात्पुरता वापरावा लागेल. Alt आणि Shift ह्या कळा एकदम दाबून आपण मराठी लिहिताना तात्पुरता इंग्रजीचा कळपाट वापरू शकाल.

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

संगणकातील कार्यकारी प्रणालीसोबत मिळालेल्या युनिकोडाचा वापर कसा करायचा?

संगणकातील कार्यकारी प्रणालीसोबत मिळालेल्या युनिकोडाचा वापर कसा करायचा?

आपल्या संगणकावरील कार्यकारी प्रणालीत युनिकोड असलं तरी अनेकदा ते कार्यरत केलेलं नसतं. विशेषतः आपण एखाद्या कंपनीचा आयता संगणक न घेता विविध भाग जुळवून तयार केलेला सांधीव संगणक घेतो तेव्हा. ते कार्यरत केलेलं नसेल अशा वेळी त्या कार्यकारी प्रणालीची चकती (सीडी) वापरून ते कार्यरत करून घ्यावं लागतं. ही प्रक्रिया एकदाच करावी लागते. पुन्हा पुन्हा चकती वापरावी लागत नाही. तेव्हा आपल्या संगणकावर युनिकोड बसवलेलं आहे की नाही हे एकदा तपासून घ्या.

युनिकोड म्हणजे काय?

युनिकोड म्हणजे काय?

युनिकोड ही लिपिचिन्हांची एक प्रमाणित संकेतप्रणाली आहे (पाहा : http://unicode.org).
  • ती वापरून आपण संगणकावर मराठीच्या देवनागरी लिपीत सहज लिहू शकतो. तो मजकूर इतरांना सहज वाचता येऊ शकतो.
  • ही प्रणाली आपल्या संगणकावरच्या कार्यकारी प्रणालीसोबतच (ऑपरेटिंग सिस्टिम).
  • ही प्रणाली आपल्याला विनामूल्य मिळते. त्यासाठी वेगळे पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसते.
  • ही संकेतप्रणाली प्रमाणित आहे. त्यामुळे गोंधळ होणं टळतं.
  • तिची व्याप्ती विशिष्ट भाषेपुरती नाही. जगातील बहुतेक प्रमुख भाषांच्या लिप्यांना ही प्रणाली सामावून घेते.
तिची माहिती करून घेतली तर आपण आपल्या स्वभाषेत आपल्या लिपीतून सहज व्यवहार करू शकतो. इतकंच नव्हे तर जगातल्या विविध भाषांच्या लिप्यांत एकाच वेळी काम करू शकतो. विविध देशांनी आणि व्यावसायिक कंपन्यांनी ही संकेतप्रणाली स्वीकारलेली आहे.

लिपिखुणांच्या प्रमाणित संकेतप्रणालीची आवश्यकता का असते?

लिपिखुणांच्या प्रमाणित संकेतप्रणालीची आवश्यकता का असते?

वर सांगितल्याप्रमाणे क्रमांक आणि त्यांच्याशी संबंधित खुणा ह्यांचा संच म्हणजे लिपिखुणांची संकेतप्रणाली. पण अशा विविध संकेतप्रणाल्या रचता येणं शक्य आहे. उदा. वर दिलेल्या उदाहरणातल्या क्रमांकाशी आपण ध ह्या खुणेऐवजी मा ह्या खुणेची सांगड घालू शकतो. मराठीचे आकृती, योगेश इ. टंक अशा वेगवेगळ्या संकेतप्रणाल्याच वापरत असत. ह्या प्रणाल्या एकमेकांपेक्षा वेगळ्या होत्या कारण त्यांच्यात क्रमांक आणि लिपिखुणा ह्यांची सांगड वेगवेगळी होती. म्हणजे एका संकेतप्रणालीत १०११०००१ = ध असा संकेत होता तर दुसरीत १०११०००१ = मा असा संकेत होता.

आता संगणकाला केवळ क्रमांकच कळत असल्याने आणि तो केवळ क्रमांकच साठवत असल्याने आपण लिहिलेल्या मजकुरात १०११०००१ हा क्रमांक तर असे पण तो म्हणजे कोणती खूण (ध की मा) हे टंकावर अवलंबून असायचं. आणि त्यामुळे विशिष्ट टंक नसला की साहजिकच धचा मा होत असे. म्हणजे मजकुरातल्या आकृत्या नीट उमटत नसत.

जर हे टाळायचं असेल तर क्रमांक आणि त्यांच्याशी संबंधित खुणा ह्यांतला संबंध पक्का केला पाहिजे. त्यामुळे अमुक क्रमांक म्हणजे अमुकच खूण हे ठरून जातं. एका क्रमांकावर कधीही एकच खूण राहील अशी संकेतप्रणाली प्रमाणित ठरेल. अशा संकेतप्रणालीमुळे संगणकावर आपल्या लिपीतून सहज व्यवहार करता येईल. युनिकोडामुळे अशी प्रमाणितता आणणं फारच सोपं झालं आहे.

लिपिखुणांची संकेतप्रणाली कसं काम करते?

लिपिखुणांची संकेतप्रणाली कसं काम करते?

आपण कळ दाबतो आणि संगणकाच्या पडद्यावर लिपीतली खूण उमटते. संगणकाच्या पडद्यावर आपल्याला एखाद्या लिपीतली (उदा. देवनागरी) अक्षरं उमटलेली दिसतात. खरं पाहता संगणकाला कोणत्याही लिपिखुणा (कॅरेक्टरं) कळत नाहीत. संगणक जी काही महिती साठवतो मग त्या लिपिखुणा असोत की चित्रं असोत; त्याच्या दृष्टीने ते द्विमान पद्धतीतले क्रमांक असतात. संगणकाच्या कळपाटावरची कळ आपण दाबतो तेव्हा असा एक क्रमांक आपण संगणकाकडे धाडत असतो. म्हणजे ‘ध’ ही खूण संगणकाच्या पडद्यावर उमटते तेव्हा संगणकाच्या दृष्टीने एक संकेत पाळला जातो. आपण कळ दाबून तो संकेत संगणकाला कळवतो. आपण कळ दाबतो तेव्हा एक क्रमांक उदा. १७७ (द्विमान पद्धतीत १०११०००१) हा संगणकाकडे जातो. हा क्रमांक म्हणजे ‘ध’ची खूण असा संकेत आधी ठरलेला असल्याने संगणकाच्या पडद्यावर ‘ध’ उमटतो.

अशाच रीतीने काही क्रमांक आपण कळा दाबून संगणकाकडे पोहोचवतो आणि त्या त्या क्रमांकाशी संबंधित खुणा पडद्यावर उमटतात. (इथे लक्षात ठेवायचा मुद्दा हा की दाबलेली कळ आणि उमटणारी खूण ह्यांचा थेट संबंध नाही. कळ दाबल्याने क्रमांक जातो आणि क्रमांक गेल्याने खूण उमटते. तेव्हा क्रमांक आणि खूण ह्यांचा संबंध अधिक महत्त्वाचा आहे.) क्रमांक आणि त्यांच्याशी संबंधित खुणा ह्यांचा एक संच ह्यातून साकारतो. ह्या संचाला त्या विशिष्ट लिपिखुणांची संकेतप्रणाली म्हणता येईल.

संकेतप्रणाली म्हणजे काय?

संकेतप्रणाली म्हणजे काय?

संकेतप्रणाली म्हणजे संकेतांची व्यवस्था. आपण व्यवहारात अनेक संकेतव्यवस्था वापरत असतो. लाल दिवा लागला की वाहनं थांबवायची हा एक संकेत आहे. ह्यात लाल दिवा लागणं आणि लोकांनी गाड्या थांबवणं ह्या दोन गोष्टींची सांगड बसली आहे. त्यामुळे जेव्हा कधी लाल दिवा लागतो तेव्हा लोक गाड्या थांबवतात. वाहन चालवायला शिकताना आपण हा संकेत आत्मसात करतो. लाल दिवा लागल्यावर वाहन थांबवायचं, हिरवा लागल्यावर थांबवलेलं सुरू करायचं, बाण काढलेला दिसला की वळण आहे हे समजयचं असे अनेक संकेत मिळून संकेतांची व्यवस्था बनते. उदा. वाहतुकीच्या संकेतांची व्यवस्था.

तसंच संगणकावर एक कृती केल्यावर दुसरी काही एक गोष्ट घडणं ह्या प्रकाराला संकेत म्हणायचं. संगणकाकडून काही कृती करून घ्यायच्या असतील तर त्याने त्या कृती कराव्यात हे त्याला सांगावं लागतं. ते सांगण्यासाठी विविध संकेतव्यवस्था वापरल्या जातात. उदा. आपण विशिष्ट कळ दाबली की पडद्यावर विशिष्ट आकृती उमटली पाहिजे. लिपितली चिन्हं अशा रीतीने पडद्यावर उमटवणार्‍या संकेतप्रणालीला लिपिखुणांची संकेतप्रणाली म्हणता येईल.

मराठीतून संगणकावर व्यवहार करताना ह्या अडचणी का येतात?

मराठीतून संगणकावर व्यवहार करताना ह्या अडचणी का येतात?

आपल्या लिपीतून संगणकावर व्यवहार करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी करता आल्या पाहिजेत.
  1. आपल्या लिपीतली चिन्हं त्यांच्या मांडणीच्या नियमांसकट (उदा. क+ी = की, द+्+य = द्य) संगणकाच्या पडद्यावर उमटवता आली पाहिजेत. आपण कळपाट (की-बोर्ड) वापरून, त्याच्या कळा दाबून हव्या त्या लिपिखुणा पडद्यावर उमटवू शकलो पाहिजे.
  2. आपण अशा रीतीने तयार केलेला मजकूर संगणकात व्यवस्थित साठवता आला पाहिजे आणि तो ज्या व्यक्तीला आपण पाठवू त्या व्यक्तीच्या संगणकाच्या पडद्यावर तसाच नीट उमटला पाहिजे.
ह्यासाठी आपल्याला सार्वत्रिक, प्रमाणित संकेतप्रणालीची आवश्यकता आहे (आपल्याकडे अनेकदा सार्वत्रिक कळपाटाची असं म्हणतात ते चूक आहे). वर सांगितलेल्या अडचणी यायच्या, कारण अशी प्रमाणित संकेतप्रणाली मराठीसाठी उपलब्ध नव्हती.

संगणकावर मराठीतून व्यवहार करताना येणार्याी अडचणी कोणत्या?

संगणकावर मराठीतून व्यवहार करताना येणार्‍या अडचणी कोणत्या?

संगणकावर मराठीतून व्यवहार करण्याची अनेकांची इच्छा असते. पण त्यात अनेक अडचणी आहेत हे आपण ऐकत असतो. अनुभवतही असतो. मुख्य अडचण म्हणजे सार्वत्रिक कळपाटाची (खरं तर सार्वत्रिक संकेतप्रणालीची). त्यामुळे एका टंकात (फॉण्टात) लिहिलेला मजकूर कुणाला पाठवला तर त्या व्यक्तीकडे तोच टंक (फॉण्ट) असल्याशिवाय तो मजकूर दिसणार नाही. ह्यामुळेच महाजालावर (नेटावर) संकेतस्थळ (वेबसाइट) रचताना सोबत टंक उतरवून घेण्याची सोय द्यावी लागते. आपल्याकड तो टंक नसेल तर पानावर केवळ गिरबिडच दिसते. वेगवेगळी संकेतस्थळं वेगवेगळ्या टंकांत (नि एकमेकांशी न जुळणार्‍या संकेतप्रणालीत) असल्याने गूगलसारखे हुडके (सर्च-इंजिनं) वापरून माहिती शोधायची म्हटली तरी शोधता येत नाही. इ-टपाल (इ-मेल) पाठवताना तर हे फारच त्रासाचं वाटतं. त्यापेक्षा रोमी (रोमन) लिपीतच मराठी लिहिण्याचा मार्ग अनेक जण पत्करतात. त्यात समाधान लाभत नाही पण काम तर भागतं.