शुक्रवार, ६ जुलै, २०१८

न्यायालयांतील भरतीपरीक्षेसाठी प्रमाणेतर टंकाचा वापर : प्रकट निवेदन

 

प्रति,
प्रबंधक,
मा. उच्च न्यायालय, मुंबई

जिल्हा आणि सत्र न्यायालयांतील काही पदांसाठी भरती करण्यासाठी आपल्याद्वारे टंकलेखनाच्या परीक्षा जुलै २०१८ आणि ऑगस्ट २०१८ ह्या महिन्यांत घेण्यात येत आहेत. सदर परीक्षांसंदर्भातील सूचना आपल्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.  त्यांचे दुवे खाली जोडले आहेत.
http://bombayhighcourt.nic.in/recruitment/PDF/recruitbom20180607180606.pdf
http://bombayhighcourt.nic.in/recruitment/PDF/recruitbom20180704122601.pdf
​तसेच टंकलेखनपरीक्षेसंदर्भातील सूचना
​http://bombayhighcourt.nic.in/recruitment/PDF/recruitbom20180630170505.pdf

​ह्या सूचनांत मराठीच्या टंकलेखनपरीक्षांसाठी कृतिदेव ०५५ ह्या टंकाचा वापर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. सदर संदर्भात काही बाबी आपल्या निदर्शनास आणणे महत्त्वाचे वाटते.

संगणकावर कोणत्याही भाषेतील मजकुराचा तिच्या लिपीसह वापर करताना युनिकोड (http://www.unicode.org/standard/translations/marathi.html) ही आधुनिक संकेतप्रणाली वापरण्याचा प्रघात आहे. ह्यामुळे मजकुराची देवाणघेवाण करणे तसेच मजकुरावर विविध संगणकीय प्रक्रिया करणे सुकर होते. सर्व आधुनिक संगणकीय साधनांत लिखित मजकूर तयार करणे आणि वितरित करणे ह्यासाठी युनिकोड-संकेतप्रणालीचाच वापर करण्यात येतो, तसेच त्यासाठी युनिकोड-आधारित टंक वापरण्यात येतात. असे अनेक युनिकोड-आधारित टंक महाजालावर विनामूल्य तसेच मुक्त स्वरूपात उपलब्ध आहेत.

सदर परीक्षेसाठी वापरण्यात येणारा कृतिदेव ०५५ हा टंक युनिकोड-आधारित टंक नाही. (https://en.wikipedia.org/wiki/Kruti_Dev)

​भारतीय भाषांच्या संगणकावरील गुणवत्तापूर्ण वापरासाठी युनिकोड-संकेतप्रणालीचा वापर आवश्यक आहे. ह्याबाबत गृहमंत्रालयाच्या राजभाषा विभागाने आपल्या हिंदीसंदर्भातील ​वार्षिक धोरणात तसे स्पष्ट निदेश दिलेले आहेत. (http://www.rajbhasha.nic.in/sites/default/files/ap20172018_8.pdf सदर धोरणातील २६ क्रमांकाचा निदेश पाहावा.)

महाराष्ट्र-शासनानेही २००८ पासूनच आपल्या कामकाजात मराठीच्या संगणकीय वापरासाठी युनिकोड-संकेतप्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाहा :
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20080910134320001.pdf
तसेच
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201301151243278833.pdf

आजवर देवनागरी टंकलेखनासाठी विविध आराखडे वापरण्यात येत असत. केंद्रशासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाने १९८६ साली देवनागरी टंकलेखनासाठी इन्स्क्रिप्ट ह्या आराखड्याला प्रमाणक म्हणून मान्यता दिली. १९८८मध्ये त्यात काही सुधारणा करण्यात आल्या आणि १९९१ साली भारतीय मानक ब्यूरोने (http://www.bis.org.in/) इन्स्क्रिप्ट हा आराखडा प्रमाणित केला आहे (IS 13194 : 1991, UDC 681.3 पृ. १५).
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ह्यांनी तयार केलेल्या सुधारित नियमावली, २०१४नुसार टंकलेखनाच्या परीक्षा संगणकावर घेण्यात येतात (शासन निर्णय क्रमांक:- एसपीई-१०१२/(१०८/१२/साशि-१ दि. ३१ ऑक्टोबर २०१३). उपरोक्त शासननिर्णयात पृ. ३ वरील ८व्या मुद्द्यात “मराठी संगणक टंकलेखन अभ्यासक्रमामध्ये युनिकोड प्रणालीनुसार की-बोर्ड वर Inscript Layout चा वापर करून मराठी टंकलेखनाचा सराव आवश्यक राहील.” असे म्हटले आहे.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201310311537438021.pdf

तरी उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता न्यायालयातील मराठीच्या वापरासाठीही आपण अद्ययावत तंत्रज्ञान वापरावे आणि सदर परीक्षा युनिकोड-आधारित टंक वापरून इन्स्क्रिप्ट ह्या आराखड्यावर घेण्यात याव्या ही विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: